दोन वाहनांना धडक देणाऱ्या शिवशाही बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सोमवारी रात्री 8 वा.सुमारास शहरातील मुख्य बसस्थानकाच्या पुढे मंगला हॉटेल समोर विचित्र अपघात घडला. यात एसटीच्या शिवशाही गाडीची धडक बसून नॅनो आणि रिक्षा या दोन वाहनांचे नुकसान झाले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात शिवशाही चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश तुकाराम शिवथरे (42,रा.कळंबे सर्जापूर वाई,सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. सोमवारी रात्री तो आपल्या ताब्याती शिवशाही गाडी घेउन रहाटाघराच्या दिशेने जात होता. मुख्य बसस्थानकातून बाहेर पडल्यावर काही अंतरावर असलेल्या मंगला हॉटेल समोर शिवशाही गाडीची बाजुला असलेली डिकी अचानकपणे उघडली गेली.तिची धडक बाजुनेच चाललेल्या रिक्षेला पाठीमागून बसल्याने रिक्षा फरफटत पुढील नॅनो कारवर आदळली. या अपघातात रिक्षा आणि नॅनो या दोन्ही वाहनांचे नुकसान झालेले असून काही काळ या रस्त्यावरील वाहतुक खोळंबली होती.दरम्यान,वाहतुक आणि शहर पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत अपघाताचा पंचनामा करुन काहीवेळाने वाहतुक सुरळीत केली होती.