रत्नागिरी:- कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे दोन वर्षानंतर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांचे प्रत्यक्ष अध्यापन सुरु झाल्यामुळे 2 हजार 713 शाळांमधील किलबिलाट सुरु झाला. जिल्ह्यातील 80 हजार 797 विद्यार्थ्यांपैकी 71 हजार 346 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून 9 हजार 451 विद्यार्थी अजुनही गैरहजर होते.
शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरु करण्याचे आदेश दिले होते. ते बुधवारपासून अंमलात आणला गेले. ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंत सर्व शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुुरु झाले. एका बेंचवर एक विद्यार्थी असे नियोजन करण्यात आल्यामुळे मोठ्या पटाच्या शाळांमध्ये नियोजन केले आहे. दिवसभरात तिन तास शाळा भरणार असल्यामुळे काहींनी दोन सत्रे तर काही शाळांनी एका दिवशी मुले आणि दुसर्या दिवशी मुली असे नियोजन केले आहे. मास्क, सॅनिटायझिंग आणि शारिरीक अंतर यांचे पालन करण्याच्या सुचना शाळांना दिल्या होत्या. अनेक पालकांनी मुलांना स्वतः शाळेत नेण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणार्या विद्यार्थ्यांची एसटी बंदमुळे गैरसोय झाली. अनेक पालकांनी खासगी गाड्या करुन पाल्याला शाळेत आणले होते. शहरी भागातील काही शाळा अजुनही सुरु झालेल्या नाहीत; मात्र जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य शाळांमधील विद्यार्थी हजर होते. कोरोनातील दोन वर्षांनी प्रथमच शाळेत येत असलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागात जोरदार स्वागत झाले. औक्षण करुन विद्यार्थ्यांना वर्गात आणले गेले. काही शाळांत पुष्पगुच्छ, पुस्तके भेट देऊन स्वागत करण्यात आला. सगळीकडे आनंदाचा माहोल पहायला मिळत होता.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 हजार 600 पैकी 2 हजार 559 शाळा तर शहरातील 159 पैकी 154 शाळांमधील किलबिलाट सुरु झाला. शिक्षकांना शाळांना येण्यापुर्वी कोरोना चाचणी किंवा दोन लस घेणे बंधनकारक केले होते. 6 हजार 284 पैकी 5 हजार 974 शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. कोरोना बाधित सापडलेल्या गावातील शाळा बंदच ठेवण्यात आल्या असून दापोली व मंडणगडमधील आश्रमशाळा बंदच आहेत. काही खासगी शाळा पालकसभा न घेतल्यामुळे सुरु नाहीत.