दोन वर्षात जि. प. शाळांचा पट चौदाशेने वाढला 

रत्नागिरी:- शैक्षणिक दर्जा, पायाभूत सुविधांसह इंग्रजी माध्यमांकडील कल वाढू लागल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत होता. मागील दोन वर्षात मोकळा श्वास, पहिलं पाऊल, रत्नागिरीचा भास्कराचार्य, शिष्यवृत्ती व सराव परिक्षांवर दिलेले लक्ष्य, जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान, रत्नागिरी टॅलेंट सर्च या सारख्या शैक्षणिक उपक्रमांमुळे दर्जा सुधारत असून विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास होत आहे. त्याचा फायदा पट वाढीसाठी झाला असून दोन वर्षात चौदाशे विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

जिल्हा परिषद शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र मागील काही वर्षात दिसत होते. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांबरोबरच शिक्षण विभागाने विशेष नियोजन केले होते. कोविड कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातूनही अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करुन दिले तर इंटरनेट सुविधा नव्हती तेथे शिक्षकांनी स्वत: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. १ ली ते ८ वी साठी स्वत:च्या स्वाध्याय पुस्तिका कमी कालावधीत सर्वदूर पोहोच केल्या. त्याचा फायदा जिल्हा परिषद शाळांचा पट वाढीला झाला. शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा व अन्य सोई सवलतीमुळे मुलांचा कल वाढत आहे. पट टिकविण्यासाठी पहिले पाऊल, शाळा पूर्व तयारी मेळावे, स्वाध्याय उपक्रम, गणवेश, पाठयपुस्तक असे उपक्रम परिणामकारक पणे राबविले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा चांगला निकाल, सेमी इंग्रजी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे सुजाण पालकांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये ओढा वाढत चालला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी विशेष लक्ष दिले होते. २०२२ चा नवोदयचा निकालातही ८० विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांचेच निवडले गेले.