रत्नागिरी:-कोरोनामुळे दोन वर्षे न होणारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली यंदा ऑनलाईन पध्दतीने करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सुगम, दुर्गम भागातील शाळांची यादी नवीन निकषानुसार तयार केली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. यासाठी सुधारित धोरण निश्चित केले आहे. 31 मे अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड च्या कर्मचार्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्याबाबत धोरण निश्चित केले होते. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. परंतु शिक्षकांची मोठी संख्या व कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन सरकारने यात बदल केला आहे. आता अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा केलेल्या शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. विविध आजारांनी त्रस्त असणार्या शिक्षकांचा विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये समावेश केला आहे. व्याधीग्रस्त शिक्षकांच्या जोडीदारांचा यात समावेश केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग दोनमध्ये समावेश आहे. सलग दहा अथवा पाच वर्षे सेवा झालेले शिक्षकच नव्या धोरणात बदलीस पात्र ठरणार आहेत. रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. याद्या प्रसिध्द केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेतला जाईल. बदली प्रक्रिया सहा टप्प्यात राबविली जाईल. बदलीच्या ठिकाणी शिक्षक रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुध्द कारवाई करण्यात येईल. बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राहणार आहे. राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदली गैरसोयीची असेल तर त्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षकास विभागीय आयुक्तांकडे अपिल करण्याची मुभा आहे.