दोन वर्षांनंतर दणक्यात साजरा होणार शाळा प्रवेशोत्सव सोहळा

रत्नागिरी:- कोरोनामुळे नवागतांना शाळेचा पहिला दिवस अनुभवता आलेला नव्हता. मात्र यंदा परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या दणक्यात साजरा करण्यासाठी शिक्षण विभाग, शिक्षक आणि पालक वर्ग सज्ज झाला आहे. येत्या १५ जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार असून जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार प्राथमिक शाळांमध्ये १२ हजार २०६ नवागतांचे स्वागत करण्यात येणार आहे.

शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागतांच्या स्वागताबरोबरच विद्यार्थ्यांच्या हातात पाठपुस्तके देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. जिल्ह्यासाठी मागणी केलेल्या ६ लाख १४ हजार ६६ पाठपुस्तक संचापैकी ५ लाख २७ हजार १८७ पुस्तक संच (८५.८५ टक्के) शिक्षण विभागाकडे यापूर्वीच पाप्त झालेले आहेत. तालुकास्तरावर पुस्तकांचे वितरण सुरू झाले आहे. येत्या १५ जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा नव्या शैक्षणिक वर्षाच्या आरंभाने पुन्हा गजबजणार आहेत. कोरोनाच्या सावटानंतर यावर्षीचे नवे शैक्षणिक वर्ष मोठ्या उत्साहाने सुरू होणार आहे. त्याबाबचे सर्व नियोजन शिक्षण विभागस्तरावरून करण्यात आलेले आहे. शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमात ६ ते १४ वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी नियोजन करण्यात शिक्षण विभाग गुंतला आहे. १०० टक्के पटनोंदणी, १०० टक्के उपस्थिती, गळतीचे पमाण शुन्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अशा योजना राबविण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तकदिन साजरा करण्यात येणार आहे. १ ली ते ८ वी मध्ये शिकणार्या लाभार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वितरण करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावरून ती केंद्र प्रमुखांकडे दिली जाणार आहेत.