दोन महिन्यांनंतरही कर्मचारी मागणीवर ठाम

एसटी बंद ; ६६७ कर्मचारी झाले हजर

रत्नागिरी:- एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला दोन महिने पूर्ण झाले. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून कर्मचाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. मात्र विलीनीकरणावर कर्मचारी ठाम असल्याने ही आर या पारची अंतिम लढाई असल्याचे कामगारांनी सांगितले. दरम्यान जिल्ह्यात आज ६६७ कर्मचारी हजर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात आज प्रशासकीय २६२, कार्यशाळा १९४, चालक ८६, वाहक ७० आणि चालक तथा वाहक ५५ असे ६६७ कर्मचारी कामावर उपस्थित होते. तसेच १०३ कर्मचारी अधिकृत रजेवर होते. आता २९०९ कर्मचारी आंदोलनात सक्रिय आहेत. काल तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे संपातील कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे. याबाबत उलटसुलट चर्चाही कामगारांमध्ये सुरू होती.

एसटी संपामुळे बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण कमी आहे तसेच आता शाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास वाचला आहे. अन्यथा या विद्यार्थ्यांना प्रवासाकरिता खासगी वाहनांचा उपयोग करावा लागत होता. परंतु ग्रामीण व शहरी कामगारांचे संपामुळे नुकसान होत आहे. हा संप कधी मिटतोय याकडे या साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्ह्यात गुरुवारपर्यंत एकूण २४ हजार ६२५ प्रवाशांनी प्रवास केला. यातून एसटी विभागाला ६ लाख ८ हजार ८४६ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. मंडणगड ३६६, दापोली ५८५०, खेड २२५०, चिपळूण ३८७४, गुहागर ७५, देवरुख ८१९९, रत्नागिरी ५४, लांजा २८१, राजापूर ३६७६ प्रवाशांनी प्रवास केला. एसटीचे उत्पन्न गेल्या दोन दिवसांपासून वाढू लागले आहे. परंतु चालक, वाहक जोपर्यंत हजर होत नाहीत तोपर्यंत एसटीची चाके थांबलेलीच राहणार आहेत.