दोन पैकी एक कासव किनारपट्टीला तर एक खोल समुद्राकडे

रत्नागिरी:- गुहागर किनार्‍यावरुन सोडण्यात आलेल्या दोन कासवांपैकी गुहा हे कासव किनारी भागाकडे वळले असून बागेश्री अरबी समुद्रात खोल पाण्याच्या दिशेने गेले होते. गुहा हे कासव पुन्हा घरटे करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला आहे.

ऑलिव्ह रिडले टर्टल सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्पांतर्गत मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था यांचा सहयोगातून कासवांचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. गुहागर किनार्‍यावरुन २२ फेब्रुवारीला सकाळी टॅॅगिंग केलेली दोन कासवं समुद्रात सोडण्यात आली आहेत. त्यातील एकाचे नाव बागेश्री आणि गुहा असे ठेवण्यात आले आहे. त्यावर लक्ष ठेवण्यात आले असून त्याची निरीक्षणे घेण्यास सुरवात झाली आहे. समुद्रातील प्रवास सुरु झाल्यानंतर दोन्ही कासवे अपेक्षेने किनार्‍यापासून ३० किलोमीटर आतवर गेले. गुहा कासवाने ४५ किमी अंतर पार केले. बागेश्री वाशिष्ठी नदीच्या मुखापासून गुहागर किनार्‍यापासून उत्तरेला सरळ १५ किमी अंतरावर होती, तर गुहा किनार्‍यापासून १० किमी अंतरावर होते. त्यांचा प्रवास उत्तरेकडे सुरु होता. एक आठवड्यानंतर गुहा उत्तरेकडील समुद्रकिनारी परिसरात आढळून आले. ते बहुदा दुसरे घरटे करण्याच्या प्रयत्नात असल्याचा अंदाज बांधला जात आहे. ते वेळास किनार्‍यावर कमी पाण्याच्या परिसरात विहार करताना दिसते. तसेच बागेश्री कासव गुहाच्या तुलनेने थोडी अधिक वेगाने प्रवास करत आहे. कदाचित ते अरबी समुद्रातील योग्य प्रवाह येण्याची वाट पाहत असुन त्याचा प्रवास उत्तरेकडे सुरु राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील वर्षी सोडण्यात आलेल्या पाच कासवांपेक्षा गुहा आणि बागेश्री या दोन्ही कासवांचा प्रवास धिम्या गतीने सुरु आहे. ती अरबी समुद्रातच आहेत. गतवर्षीही एका कासवाने दोनवेळा घरटी केली होती. यंदाही एक कासव दुसरे घरटे घालण्याची शक्यता आहे.