दोन्ही गटासाठीची लस; पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न
रत्नागिरी:-मागणी अधिक आणि लस कमी या परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. रविवारी (ता. 9) सायंकाळी 45 वर्षांवरील लोकांसाठी कोविशिल्डचे 18 हजार आणि 18 ते 44 वर्षातील गटासाठी कोविशिल्डचे 8 हजार 700 आणि कोव्हॅक्सिनचे 1 हजार 20 अशा मिळून 27 हजार 720 मात्रा जिल्ह्याला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम सुरळीत होणार आहे.
शहरी भागातील केंद्रांबरोबरच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून 80 ठिकाणी मोहीम राबविली जात आहे. 45 वर्षांवरील आणि 18 ते 44 वयोगट अशा दोन भागात लस दिली जात आहे. लशीचा साठा अपुरा मिळत असल्याने ऑनलाईन नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. 45 वर्षांवरील लोकांचे सोमवारी नियोजन केले आहे. तर दुसर्या गटातील लोकांना मंगळवारी (ता. 11) लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 1 लाख 90 हजार लोकांना लस देण्यात आली आहे.
ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन नोंदणी करता येत नसल्यामुळे गोंधळ उडतो. अन्य भागातील माणसे त्या-त्या केंद्रांवर जाऊन लस घेत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कडक सुचनाही दिलेल्या आहेत. लस अधिक मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राउत, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. रविवारी जिल्ह्याला सर्वाधिक साठा प्राप्त झाला आहे. त्याचे जिल्ह्यात योग्य पध्दतीने वितरण व्हावे यासाठी जिल्हा परिषद आरोग्य सभापती
उदय बने यांनी नियोजन केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून त्या-त्या केंद्रांवर मात्रा पोचवण्यात येत आहेत. केंद्रांवरील गर्दी नियंत्रीत करण्यासाठी प्रशासनाकडून सामाजिकक संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली जात आहे. सध्या 27 हजार 720 डोस मिळाले असून तो साठा पुढील दोन दिवस पुरणार आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही साखळी कायम राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.