देव पावला; लंडनहुन आलेल्या दहापैकी चौघांचा अहवाल निगेटिव्ह तर दोघांचा अद्यापही शोध सुरू

रत्नागिरी:- जिल्ह्यात लंडनवरून 10 जण आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला मिळताच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. दहापैकी 4 जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला असून चारही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरीत आलेल्या अन्य दोघांचा शोध प्रशासनाकडून सुरू आहे.  

इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्ट्रेन आढळून आला. या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत इंग्लंड येथून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्ह्यात लंडन येथून दहा प्रवासी दाखल झाले. यातील सहाजण रत्नागिरीत उतरले तर 3 जण संगमेश्वर येथे. एकजण रायगड येथे निघून गेला आहे. रत्नागिरीत आलेल्या सहापैकी चारजणांना आरोग्य विभागाने आयसोलेट केले. या चौघांचा स्वॅब घेण्यात आला. याचा अहवाल गुरुवारी रात्री प्राप्त झाला असून चारही जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरीत आलेल्या सहापैकी अन्य दोघांचा शोध घेण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. चार जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांसह रत्नागिरीकरांचा जीव भांड्यात पडला आहे. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे.