देवाचे गोठणे येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळून खाक

राजापूर:- तालुक्यातील देवाचे गोठणे-उंबरवाडी येथील भूपेंद्र परशुराम गोवळकर व नरेश परशुराम गोवळकर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घर जळून् खाक झाले. घराच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे गोवळकर कुटुंबीयांचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे.

देवाचे गोठणे-उंबरवाडी येथील गोवळकर यांच्या घरात सकाळी घरातील सर्व मंडळी कामासाठी घरच्या बाहेर पडली. त्यानंतर घरात शॉर्टसर्किटमुळे घराला प्रचंड आग लागली. त्यात संपूर्ण घर जळून खाक झाले. आग लागल्याची घटना समजल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी आरडाओरड केली. त्यानंतर आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले; मात्र आगीत घरातील सर्व सामान, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या तसेच घराची कौले, कोने, वासे, भिंतीदेखील कोसळल्या. गावातील पोलिसपाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा सविस्तर पंचनामा केला.