जिल्हाधिकारी मिश्रा यांचे नवे आदेश
रत्नागिरी:- शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हाधिकारी यांनी नवीन आदेश देताना देवदेवतांच्या पालख्या २५ लोकांच्या उपस्थितीमध्ये घरोघरी नेता येतील, असे म्हटले आहे. यामुळे कोकणातील शिमगोत्सवात आता भाविकांना आपल्या इष्ट देवतेची घरासमोर भेट होणार आहे. त्यासाठी प्रातांच्या परवानगीची आवश्यकता आहे.
तसेच चाकरमान्यांनी शिमगोत्सवात गावाकडे येणे टाळावे असे आवाहन देखील जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. अगदीच आवश्यकता असल्यासच गावाकडे यावे. मात्र कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. या पार्श्वभूमीवर गावागावात ग्रामकृती दल आणि नागरी कृती दल दक्ष ठेवण्यात आली आहेत. मुंबई, पुणेसह बाहेरून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. यात प्रत्येकाच्या तापमानाची नोंद घेण्यात येईल. लक्षण नसलेल्या चारकमान्यांनाच शिमगोत्सवात सहभागी होता येईल. एखाद्याला लक्षण आढळल्यास त्याला विलीगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
यंदाचा शिमगोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. 25 ते 50 जणांच्या उपस्थितीत हा सण साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्रसाद वाटप, पालखी नाचवणे टाळावे असेही ते म्हणाले. गावात आलेली मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिल्या आहेत.