देवरुख-मार्लेश्वर मार्गावर दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

देवरुख:- देवरुख-मार्लेश्वर रस्त्यावर निलेश बांडागळे यांच्या घरासमोर दिनांक २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात आत्माराम भागोजी गोंधळी (वय ६४, रा. मौजे मुरादपूर वरचीवाडी, ता. संगमेश्वर) या पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी निष्काळजीपणे दुचाकी चालवणाऱ्या मुरलीधर श्रीधर खेडेकर (वय ३३, रा. मौजे मुरादपूर वरचीवाडी, ता. संगमेश्वर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुरलीधर खेडेकर हा त्याच्या ताब्यातील (एमएच०९/डिपी/७००२) हिरो कंपनीची मोटारसायकल मार्लेश्वरकडून देवरुखकडे जात असताना, रस्त्याची परिस्थिती न पाहता निष्काळजीपणे आणि हयगयीने चालवत होता. त्यावेळी निलेश बांडागळे यांच्या घरासमोरून चालत जाणाऱ्या आत्माराम गोंधळी यांना दुचाकीची धडक बसली.

या अपघातात आत्माराम गोंधळी यांच्या डोक्याला, हात, पाय आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटल आणि पुढे कोल्हापूर येथील सी.पी.आर. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार मुरलीधर खेडेकर यालाही दुखापत झाली असून त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम सिताराम पंदेरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुरलीधर खेडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे, आरोपीने चालवलेल्या दुचाकीचा विमा देखील संपलेला होता, असे पोलिसांनी सांगितले.