दुसऱ्या लाटेत 973 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

रत्नागिरी:- दुसर्‍या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक होणार्‍या जिल्ह्यात रत्नागिरी राज्यात पहिल्या पाच क्रमांकात आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यावर मात करण्यासाठी गेले काही दिवस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून आजच्या घडीला जिल्ह्यातील 1 हजार 534 पैकी 973 गावांनी कोरोनाला वेशीबाहेर करण्यात यश मिळवले. 25 पेक्षा अधिक बाधित असलेली गावे 29 आहेत. त्यात मंडणगड तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ही राज्यासाठी चिंताजनक बाब बनली आहे. त्यात डेल्टा प्लसने नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. गुरुवारी (ता. 24) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही रत्नागिरीसह सात जिल्ह्यातील निर्बंध उठवण्यास घाई करु नका अशा सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सध्या उपचाराखालील बाधितांची संख्या पाच हजारावर आहे. वाढत्या बाधितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसात जिल्हा प्रशासनाकडून गाव, वाडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. जास्तीत जास्त रुग्ण शोधण्यासाठी चाचण्यांची मोहीम हाती घेतली आहे. गावागावात जनजागृती करतानाच कोरोना मुक्त गाव स्पर्धेंसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्हा परिषद ग्राम विकास विभागाकडून सरपंच, सदस्यांसह ग्रामसेवकांची मदत घेतली जात आहे. बाधितांना गावाजवळ राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे चाचण्यासांठी लोक पुढे येत आहेत. त्यामधून बाधितांना शोधणे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले आहे. महिन्याभरापुर्वी जिल्ह्यात 64 गावे कोरोनामुक्त होती. त्यात मोठी वाढ झाली असून सध्या जिल्ह्यात 846 ग्रामपंचायतींमधील 1,534 महसुली गावांपैकी 973 गावात कोरोनाचा एकही बाधित नाही. 15 बाधित असलेली 487 गावे, 16 ते 24 बाधित असलेली 38 गावे तर 25 पेक्षा अधिक बाधित असलेली अवघी 29 गावे आहेत. मंडणगड तालुक्यात चांगली स्थिती असून 107 गावांपैकी 105 गावे कोरोनामुक्त आहेत. अवघ 2 गावांत बाधित आढळले आहेत.