रत्नागिरी:- अवकाळी पावसामुळे यंदा हंगामाच्या आरंभी आलेल्या मोहोरातून अत्यल्प उत्पादन मिळणार आहे. तर शेवटच्या टप्प्यात प्रचंड थंडीमुळे मोठ्याप्रमाणात आलेला मोहोरही वांझ असल्याने यंदाच्या हंगामातील हापूसचे उत्पादन कमी राहणार असल्याचा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे.
वातावरणात सातत्याने होणार्या बदलांचा परिणाम यंदा हापूसच्या उत्पादनावर होत आहे. परतीचा पाऊस ऑक्टोबर मध्यापर्यंत होता. पुढे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम पहिल्या, दुसर्या टप्प्यात हापूस कलमांवर आलेल्या मोहोरावर झाला. मोहोर काळा पडून गळून गेला तर त्यामधून वाचलेली कैरी बर्यापैकी पडून गेली आहे. सुरवातीची बारीक कैरी वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांनी औषध फवारणीवर भर दिला. त्यामुळे पाच टक्क्याहून कमीच उत्पादन हाती लागेल अशी स्थिती आहे. हे करण्यासाठीही बागायतदारांना हवामानाच्या बदलत्या स्थितीवर लक्ष ठेवून रहावे लागले. डिसेंबर अखेरीस अवकाळीनंतर थंडीला सुरवात झाली. परिणामी पौष महिन्यात बहूसंख्य झाडांना मोहोर आला. त्या मोहोरामध्येही नर फुले अधिक असल्यामुळे मिळणारी फळं कमीच आहेत. त्या मोहोराचा काहीच उपयोग होणार नाही. नरफुलामुळे सेटींग व्यवस्थिती होणार नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या दोन दिवसात थंडीचा जोर कमी झाला आहे. गरमी वाढल्याने पहिल्या टप्प्यातील आंबा बाजारात येण्यास सज्ज होईल. रत्नागिरी तालुक्यातील पावस पट्ट्यातील अनेक बागांमध्ये पुढील पंधरा ते वीस दिवसात आंबा काढणीयोग्य होईल. त्यामुळे रत्नागिरीतून काही हापूसच्या पेट्या बाजारात रवाना होणार आहेत.
—-
कोट
कोट
यंदा अवकाळी पावसातून मोहोर सांभाळण्यासाठी फवारणींचा हात अधिक घ्यावा लागला. काही ठिकाणी जानेवारी महिन्यात पडलेल्या पावसामुळे कैरी गळून गेली. यंदा विचित्र हवामानाचा फटका हापूसच्या उत्पादनावर होणार आहे.
– संदिप डोंगरे, माजी कृषी अधिकारी









