रत्नागिरी:- जगभरात वर्षभरापासून ठाण मांडून बसलेल्या ‘कोरोना’ आता कुटुंबच उद्धवस्त करत सुटला आहे. एका कुटुंबातील सख्ख्या भावांचा संसार फुलत असतानाच ‘कोरोना’ त्यांचा संसार उद्धवस्त केला. एका महिन्यात दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने त्यांचे चिमुकले वडिलांच्या प्रेमापासून दुर गेले आहेतच. तर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर अजय चव्हाण व त्याचा लहान भाऊ अमित चव्हाण या दोघांचेही निधन झाले आहेत.
रत्नागिरीतील रा.भा. शिर्के प्रशालेत दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण करुन उच्च शिक्षण घेतल्यानंतर मोठा अजय चव्हाण हा फोटोग्राफी क्षेत्रात उतरला. तर लहान भाऊ इंजिनिअर होऊन नेव्हीमध्ये सेवेत लागला होता. दोघांचा विवाह झाला होता. अमितला एक चिमुकला मुलगा तर अजयला एक दहा वर्षाची मुलगी तर ४ वर्षांचा एक मुलगा. दोघांचे संसार चांगलेच फुलत होते. असे असताना अचानक कोरोनाच्या संकटाने दोघांचे संसार उद्धवस्त केले.
अमित हा एप्रिल महिन्यात रायगडहून रत्नागिरीत आल्यानंतर आजरी पडला उपचार सुरु असतानाच दि.२९ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. अमितच्या मृत्यूच्या संकटातून कुटुंब सावरत असतानाच अजयला कोरोनाची लागण झाली. सुरुवातील त्यांच्या तब्बेतीत फरक पडत असतानाच अजयची तब्बेत पुन्हा खालवली. त्याला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच अजयची सुद्धा प्राणज्योत मालवली.
दोन सख्ख्या भावांचा एकाच महिन्यात मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजय चव्हाण या रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर होता. अनेक विवाह सोहळ्याची फोटोग्राफीसह व्हिडिओ चित्रण त्यांने केले होते. रत्नागिरीतील सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे जवळचे संबध होते. शाळेतील मित्रांच्या ग्रुपमध्ये अजय आजही मिसळत असे. त्यांने शाळेपासूनची मैत्री घट्ट बांधून ठेवली होती. त्यामुळे अजयच्या अचानक जाण्याने त्याच्या मित्रपरिवारावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अजय व अमित हे रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकतून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस निरिक्षक वसंतराव चव्हाण यांचे नातू होते.