खेड: तालुक्यातील शिवतर मार्गावर शनिवार, दि. ६ रोजी सांयकाळी ६.३० च्या सुमारास मुरडे खोतवाडी येथे दुचाकीची मोटारीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर स्वार असणारे अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
प्रल्हाद विठ्ठल जाबरे ( रा. आंबये, जाबरे वाडी ) हा तरुण भरणेनाका येथील लक्ष्मी मसाले या कंपनीत कामाला होता. शनिवार दि. ६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तो निलेश पारदले व पप्प्या मायनाक या दोघांसोबत दुचाकीवरून खेड ते शिवतर मार्गावरून जात होता. यावेळी मुरडे खोतवाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने त्यांची धडक मोटारीसोबत झाली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी तरुणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात प्रल्हाद विठ्ठल जाबरे याचा घटनास्थळी मृत्यू झाला.