दुचाकी घसरून एकजण ठार; एक गंभीर 

रत्नागिरी:- रत्नागिरी -कोल्हापूर मार्गावरील परटवणे येथे दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात आदित्य अनिल फोडेंकर (२३, रा.कुवारबाव) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक तरूण  आसिफ मुबारक तडवी (२२, मंडणगड) गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

आदित्य फोडेंकर हा तरुण आपल्या मित्र आसिफ मुबारक तडवी याच्या समवेत कुवारबाव येथील आपल्या घरी जात होता. परटवणे येथे दुचाकी घसरल्याने आदित्य रस्त्याला बाजूला फेकला गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक तरूण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते.अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक अमोल अनभुले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलीसांनी  मृतदेह जिल्हा  रुग्णालयात आणला. शविच्छेदन केल्यानंतर पहाटे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आदित्य आयटीआयमध्ये शिक्षण पुर्ण करुन तो प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होता. त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच रविवारी रात्री मजगांव रोड येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात नातेवाईकांसह त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती.  तर या अपघाताची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. तर  चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.