संगमेश्वर:- देवरुख रत्नागिरी मार्गावरील तुळसणी येथे गुरुवारी (११ ऑगस्ट) सकाळी अकराच्या सुमारास कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक देत अपघात केला. या अपघातातील धडक देणारा कार चालक कृष्णा लक्ष्मण जाधव ( वय 54, राहणार राजापूर) हा देवरुख पोलीस ठाण्यातील कर्मचारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अखेर आज शनिवारी (12 ऑगस्ट 2023) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायनान्स कंपनीचे दोन ऑफिसर देवरुखच्या दिशेने दुचाकीवरून ( दु. क्रमांक MH08 AZ 2060) जात होते. समोरुन पोलीस कर्मचारी कृष्णा लक्ष्मण जाधव हा आपल्या कारने (गाडी क्रमांक MH08 AX 4073) देवरुख ते रत्नागिरी असा प्रवास करीत होता. तुळसणी दरम्यान वाघबीळ मोरिवर दुचाकी आली असता समोरून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने बेजबाबदारपणे गाडी चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला दिलेली धडक इतकी जबरदस्त होती की, ऋतिक रवींद्र पवार ( वय ३० राहणार सोमेश्वर, रत्नागिरी) व कल्पेश विलास कांबळे ( वय २८ राहणार – निवसर, रत्नागिरी ) हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले. कल्पेश कांबळे यांचा पाय गुडघ्यातून पूर्ण फिरून मोडला ते बेशुध्द अवस्थेत रस्त्यावर पडले होते. तर पाठीमागे बसलेल्या ऋत्विक पवार यांना डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली. या अपघातात सुदैवाने दोघांचा ही प्राण वाचला. यामधील एकाला रत्नागिरी रुग्णालयातून त्याच दिवशी अधिक उपचारांसाठी कोल्हापूर रूग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान बेजबाबदारपणे कार चालवणाऱ्या देवरुख पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा जाधव यांच्यावर मो.वा.का.क 184 तसेच भा.द.वि.क. 279, 337, देवरुख पोलीस ठाण्यात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.