दुचाकीचा टायर फुटल्याने राजापुरातील होतकरू तरुणाचा मृत्यू

राजापूर:- मुंबई गोवा महामार्गावर कोंडये येथे दुचाकीचा टायर फुटून गंभीर अपघात झाला. या  अपघातात दुचाकीस्वार महेश अशोक करंदीकर (३० रा. राजापूर) हा जागीच ठार झाला आहे. शनिवारी सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या दरम्यान अपघाताची ही घटना घडली. महेश राजापुरातील कामाक्षी हॉटेलचे मालक अशोक करंदीकर यांचा मुलगा आहे. त्याच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महेश आपली दुचाकी घेऊन मित्र वैभव धर्माधिकारी याच्यासोबत राजापुरकडून सिंधुदुर्गकडे जात होता. कोंडये येथे त्याच्या दुचाकीचा टायर फुटला आणि हा अपघात झाला. टायर फुटल्याने वेगात असलेली दुचाकीला रस्त्यावर घसरली. या अपघातात महेश याच्यासह त्याचा मित्र देखील रस्त्यावर कोसळले. यात महेश याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला, तर सहकारी वैभव धर्माधिकारी हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत या दोघांनाही तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र यातील महेश हा मृत असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.