रत्नागिरी:- दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी सकस चारा लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पशु विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 60 लाख रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सिंधुरत्न योजनेतून ग्रामपंचायतीला चारा लागवडीसाठीची बियाणे देण्यासाठी ही मागणी केल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. एस. जगदाळे यांनी दिली.
श्री. जगदाळे यांनी जिल्हा परिषदेमध्ये पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील पशुधन परिस्थितीचा आढावा घेतला. परजिल्ह्यातून पशू आणल्यानंतर जिल्ह्यात पुरक आहार न मिळाल्यामुळे गायींचे दुध कमी होत जाते. ते वाढविण्यासाठी सकस आहार देण्यासाठी शेतकर्यांना आधार देण्याची गरज आहे. याच उद्देशाने पशुधनासाठी सकस चारा लागवडीची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकुण 845 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक गोधन असलेल्या सुमारे पावणेतीनशे गावांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात येणार आहे. त्या ग्रामपंचायतींना सुबाबुळ, दशरा, हादगा, अंजन यासारखी द्वीदल वर्गीय बहूवार्षिक झाडांची बियाणे दिली जातील. या झाडांचा चारा गायी, म्हैशींसह शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो. हा चारा दुध वाढीसाठी पोषक ठरतो. गावातील मोकळ्या जागांवर याची लागवड केली तर त्या जमिनींचाही वापर होऊ शकतो. आंबा, काजू बागांसह भातशेतीच्या बांधावरही याची लागवड करणे शक्य आहे. जनावरांचे दुध वाढले तर त्याचा फायदा आपसुकच शेतकर्याला होणार आहे. सिंधुरत्न योजनेमधून वैयक्तिक लाभ देता येत नाही, त्यासाठी ग्रामपंचायतीला विविध चारा उत्पादन करणारी 700 ते 800 किलो बियाणे द्यायची. एप्रिल, मे महिन्यात खड्डे खोदून जुन महिन्यात पावसाळा सुरु झाल्यानंतर बिया टाकायच्या. वर्ष झाल्यानंतर पाला जनावरांना खाण्यास देता येऊ शकतो. या माध्यमातून कमी दुध देणार्या गायी-म्हशींचे दुध वाढू शकतो. हिरव्या चार्याअभावी उत्पादनात घड होत असते.
कोरोनातील परिस्थिती काही पुणे, मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यांनी रोजगार म्हणून शेती आणि शेतीपुरक व्यावसाय सुरु करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुग्ध व्यावसायातून मेहनत घेतल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. गायी-गुरे पालन करणार्यांसाठी सकस चारा उत्पादनाचीही योजना पथ्थ्यावर पडू शकते.