दीप उजळले! दिवाळीच्या रोषणाईने वातावरण तेजोमय

रत्नागिरी:-निराशा, अज्ञान, दु:ख, वैर असा नकारात्मकतेचा अंध:कार दूर करत आणि आशा, ज्ञान, आनंद, मैत्री अशा सकारात्मकतेचे दीप लावत, सर्वत्र उत्साहाचा प्रकाश झळाळत दीपोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. दिवाळी आनंदाचा आणि सौख्याचा सण. यंदाच्या दिवाळीत त्याच विचारांचे दिप उजळले आणि पारंपारिकतेला साजेसा दिपोत्सवाचा आंनद अवघ्या रत्नागिरीकरांनी लुटला. 

मागील काही दिवसांपासूनचा मनोरथ गुरूवारी पहाटेला पूर्ण झाला. सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान आटोपल्यावर पहील्या पहाटेच्या चैतन्यासह सर्वांनी मनमुराद अनुभवला. फटाके फोडण्यासाठी लहानथोरांची लगबग सुरू होईल. घरादारावर आंब्याच्या पानांची आणि झेंडूच्या फुलांची तोरणे झळकू लागली. पहाटेच दारासमोर रंगबिरंगी कंदील प्रकाशमान झाले. दारात पणत्यांची आणि रांगोळयांची आरास फुलुन आली. दिवाळीच्या पहील्या पहाटेला रंगत आणली ती तरूणाईच्या उत्साहाने. गाठीभेटी आणि शुभेच्छांची पखरण, सोशल मिडीयावरून शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण. अशा उत्साही वातावरणात सगळीकडे आनंदोत्सव साजरा झाला. ही लगबग दिवसभर सुरू होती. 

गुरूवारपासून सुरू झालेला हा दीपोत्सवाचा रंगशनिवार पर्यंत सुरू राहणार आहे. गुरूवारी दिवाळी आणि लक्ष्मीपूजन तर शुक्रवारी पाडवा आणि शनिवारी भाऊबीज असून यानिमित्त भेटवस्तूंच्या खरेदीसाठी रत्नागिरी शहरात सायंकाळनंतर मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून गजबजलेली बाजारपेठेतील गर्दी आणखी तीन दिवस कायम राहणार आहे. या मोजक्याच दिवसात रत्नागिरीत कोट्यवधीची उलाढाल झाली असल्याचे बोलले जात आहे. दीपोत्सवासाठी लागणारे साहीत्य तसेच पुढील प्रत्येक सणासाठी झालेल्या खरेदीतून बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल झाली आहे. दिवाळीनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यांवर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत फटाक्याची आतीाबाजी सुरू होती.