रत्नागिरी:- शनिवारी जिल्ह्यात घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील 10 हजार घरगूती गणपतींना निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नगर परिषदेच्या हद्दीत विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धुम आहे. भक्तांच्या अनेक दिवसाची प्रतिक्षा शनिवारी संपुष्टात आली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तांच्या घरी दीड दिवसांचा पाहूणचार घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात दीड दिवसांच्या जवळपास दहा हजारपेक्षा अधिक घरगुती गणपतींना रविवारी निरोप देण्यात येणार आहे.
विसर्जनासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली होती. शहराच्या प्रत्येक भागात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून ज्यांना विसर्जन करणे शक्य नाही त्यांच्यासाठी नगर परिषदेने मूर्ती संकलन ही नवी संकल्पना राबवली आहे.









