‘दि. बॅनियन’तर्फे मानसिक आरोग्याचा जागर

रत्नागिरी:- मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘दि. बॅनियन’ संस्थेच्या रत्नागिरी शाखेने मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परंपरेचा आनंद जपत मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात आली.

या सोहळ्यात १०० हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. यामध्ये स्वयंसहायता गट, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रतिनिधी, पोलीस विभाग, शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांचा समावेश होता. एकमेकांशी संवाद साधत पारंपरिक वातावरणात हा स्नेहसोहळा पार पडला.

कार्यक्रमाला रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघामित्रा फुले आणि उपअधीक्षक डॉ. हरिणाक्षी गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

प्रोग्रॅम लीड अरुणा नारायण शिंदे आणि ममता गौतम जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी टीमने या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. समुदायात आपुलकी वाढवून मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

‘दि. बॅनियन’ची स्थापना रोजी २७ ऑगस्ट १९९३ श्रीमती वंदना गोपिकुमार आणि श्रीमती वैष्णवी जयकुमार यांच्या हस्ते झाली होती. मानसिक आजाराने ग्रस्त आणि बेघर महिलांचे पुनर्वसन करणे या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्रातील पहिले केंद्र रत्नागिरीत सुरू झाले. तेव्हापासून ही संस्था मानसिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी प्रभावीपणे काम करत आहे.