दिवाळी शुभेच्छा फलकावरून मोठ्या पक्षाच्या युवा नेत्याला डच्चू

रत्नागिरी:- रत्नागिरीत एका राजकीय पक्षात शह-काटशहाचे राजकारण जोरात रंगले आहे. मूळ पदाधिकारी विरुद्ध युवा नेता असे राजकारण जोरात रंगले असून याच वादातून त्या युवा नेत्याचा फोटो दिवाळी शुभेच्छा फलकांवरून हटवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. हाच वाद भविष्यात वाढण्याची शक्यता देखील आहे. 

शहरात दिवाळीचा आनंदोत्सव असताना एका मुख्य राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार अंतर्गत वाद सुरू असल्याचे वृत्त आहे. युवा नेता मूळ आणि मुख्य पदाधिकाऱ्यांना टक्कर देण्यासाठी निघाल्याने मुख्य पदाधिकाऱ्यांनी या युवा नेत्याला दिवाळी बॅनरच्या माध्यमातून जागा दाखवली अशी चर्चा शहरात सुरू आहे. 

दिवाळी शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण शहरात एका राजकीय पक्षाकडून झळकवण्यात आले आहेत. या फलकांवरून त्याच पक्षाच्या युवा नेत्याला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या युवा नेत्याच्या खांद्यावर नुकतीच युवकांचा मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून ही जबाबदारी मिळताच आता आपणच विधानसभा निवडणुकीचे उमेदवारच असा आविर्भाव आणल्याने वरिष्ठ या युवा नेत्यावर नाराज असल्याचे चित्र आहे. यामुळेच या युवा नेत्याला त्याच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. शहरात दिवाळी शुभेच्छा देणारे फलक या पक्षाकडून लावण्यात आले असले तरी या फलकांवर या युवा नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. पद मिळाल्यानंतर या युवा नेत्याच्या विरोधात प्रचंड तक्रारी करण्यात आल्या आहेत. या युवा नेत्याने धनुष्यबाण हाती घेण्यासाठी देखील चाचपणी केल्याची चर्चा असल्याने दिवाळी शुभेच्छा फलकांवर या युवा नेत्याला स्थान दिले नसल्याची चर्चा आहे.