दारूच्या अति व्यसनामुळे राजापुरात प्रौढाचा मृत्यू

राजापूर:- दारूच्या अति व्यसनाने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजापूर तालुक्यातील तुळसवडे येथे उघडकीस आली आहे. तुळसवडे येथील फणसीचा माळ परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली असून, या प्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पुंडलिक आडीवरेकर (वय ४५, रा. माणिक चौकवाडी, तुळसवडे, ता. राजापूर) हे दारूचे अति व्यसनी होते. दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे २२.१८ वाजण्याच्या सुमारास ते तुळसवडे येथील फणसीचा माळ परिसरात मृतावस्थेत आढळून आले.

संतोष आडीवरेकर यांचा मृत्यू हा अति दारूच्या सेवनाने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

राजापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद दि. ०२ डिसेंबर रोजी रात्री २२.१८ वाजता करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ६३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करून घेतली आहे. पुढील वैद्यकीय तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.