संगमेश्वर:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील दाभोळे गावातील अरुंद पुलावर भरधाव ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली. प्रजासत्ताक दिनी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पसार झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी आगाराची रत्नागिरी-कोल्हापूर एसटी बस (MH-09-EM-9188) चालक निलेश गोकुळ जिमकरे हे घेऊन जात होते. दुपारी १.३० च्या सुमारास बस दाभोळे गावातील अरुंद पुलावर आली असता, समोरून येणाऱ्या ट्रक (MH-09-BC-5182) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता, बेजबाबदारपणे ट्रक चालवून बसच्या उजव्या बाजूच्या मागील भागाला जोरदार धडक दिली.
अपघाताची धडक इतकी जोरात होती की बसचे नुकसान झाले आहे. मात्र, आरोपी ट्रकचालक अर्जुन मच्छिंद्र काळेल (वय ३५, रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा जखमींना मदत करण्यासाठी किंवा पोलिसांना माहिती देण्यासाठी न थांबता अपघातस्थळावरून निघून गेला.
याप्रकरणी एसटी वाहक संतोष महादेव संभोजी (वय ३४, सध्या रा. रत्नागिरी, मूळ रा. कोल्हापूर) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संगमेश्वर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.









