दाभोळमध्ये पकडलेल्या मलपी ट्रॉलरला 3 लाख 77 हजारांचा दंड 

रत्नागिरी:- सागरी नियम धुडकावत दाभोळपासून 9 नॉटिकल मैलावर मासेमारी करणार्‍या परप्रांतिय नौकांचा मत्स्य विभागाच्या पथकाने समुद्रात थरारक पाठलाग केला. पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच अनेक नौका टाकलेले जाळे कापून पळाल्या. मात्र एका नौकेला पकडण्यात यश आले आहे. भर समुद्रात पाठलाग करत परप्रांतिय नौकेवर कारवाई करणार्‍या मत्स्य विभागाच्या अधिकारी दिप्ती साळवी यांचे जातीनिशी मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान, सागरी नियम धुडकावून दाभोळपासून 9 नॉटिकल मैलावर मासेमारी करणार्‍या परप्रांतिय नौकांवर मत्स्य विभागाने धडक कारवाई करत एक नौका ताब्यात घेतली. तब्बल 3 लाख 77 हजार 750 रूपयांचा दंड नौका मालकाला ठोठावण्यात आला आहे.

सलग 2 वर्ष कोरोनामुळे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्यातच अस्मानी संकटामुळे मच्छीमारांचे कंबरडेच मोडले आहे. ऐन हंगामात वादळी वार्‍यासह धो-धो पाऊस कोसळल्याने येथील मच्छीमारांनी निसर्गासमोर हात टेकले. त्यातच परप्रांतिय मच्छीमारांची घुसखोरी हे नवे संकट स्थानिक मच्छीमारांसमोर होते.

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत येऊन परप्रांतिय मच्छीमारांनी अक्षरश: धुडघूस घातला होता. सर्व नियम धाब्यावर बसवून या परप्रांतिय मच्छीमारांनी मासेमारी सुरू ठेवली. याविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाईला सुरूवात केली.

दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरापासून 9 नॉटिकल मैलावर परप्रांतिय नौका मासेमारीसाठी आली असल्याची माहिती मत्स्य विभागाला मिळाली. या माहितीवरून मत्स्य विभागाने आपली नौका कारवाईसाठी पाठवली.

दाभोळपासून 9 नॉटिकल मैलावर या परप्रांतिय नौका मासेमारी करीत होत्या. याच दरम्यान मत्स्य विभागाचे पेट्रोलिंगचे पथकदेखील कारवाईसाठी दाभोळच्या दिशेने रवाना झाले. भर समुद्रात चित्तथरारक पाठलाग सुरू झाला.

या नौकांनी मासेमारीसाठी समुद्रात जाळी सोडली होती. मत्स्य विभागाची नौका पाहून यातील काही नौकांवरील खलाशांनी जाळ्यांचे दोर कापून टाकले व तेथून ते पळून गेले.

दरम्यान या कारवाईमध्ये मत्स्य विभागाच्या अधिकारी दिप्ती साळवी या समुद्रात पेट्रोलिंगकरिता गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी एका परप्रांतिय नौकेचा पाठलाग केला. दाभोळपासून काही अंतरावर ही परप्रांतिय नौका पकडण्यात आली.

ही नौका पकडल्यानंतर नौका मालक थेरेसा डिसूझा (रा. मेंगलोर, कर्नाटक) यांच्याविरोधात मत्स्य व्यवसाय अधिकारी दिप्ती साळवी यांनी सागरी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच जॉन लॉरेन या नौकेवरील मासळीदेखील त्यांनी जप्त केली होती.

या कारवाईत थेरेसा डिसूझा यांना मत्स्य विभागाने 3 लाख 77 हजार 750 रूपयांचा दंड ठोठावला आहे. पहिल्यांदाच ही केस सहाय्यक मत्स्य आयुक्त भादुले यांच्यासमोर चालली. पहिल्याच कारवाईत भादुले यांनी लाखो रूपयांचा दंड परप्रांतिय नौकेला सुनावला आहे.