दापोली समुद्रात बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

दापोली:- तालुक्यातील लाडघर येथील बीचवर समुद्र स्नानासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार 4 डिसेंबर रोजी घडली. मयूर दीपक चिखलकर (25, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून काही तरुण पर्यटक आले होते. रविवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हे तरुण समुद्र स्नानासाठी लाडघर येथील समुद्रात उतरले. समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना अतिउत्साही मयूर चिखलकर मोठ्या पाण्यात गेला होता. इतर मित्र बाजूला अंघोळ करत होते. यावेळी मयूर याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल समुद्रात ओढला गेला. आपण बुडले जातोय असे वाटल्यावर त्याने लगेच हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागितली. मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. ग्रामस्थांना वाचवण्यासाठी बोलावले. तोपर्यंत बराच वेळ झाला होता. ग्रामस्थांनी त्याला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरनी त्याला तपासून मयत घोषित केले. पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.