दापोली बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याची चौकशी

स्थायी समितीत निर्णय 

रत्नागिरी:- दापोलीमधील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांविरोधातील तक्रारींची दखल घेत विभागिय चौकशी लावण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच संगमेश्‍वर तालुक्यातील बंधार्‍यांची अनामत रक्कमही संबंधितांना परत करण्याच्या सुचना अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी दिल्या.

जिल्हा परिषद स्थायी समिती विक्रांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दूर दृश्यप्रणालीद्वारे झाली. या सभेला उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्यासह कृषि सभापती रेश्मा झगडे, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती सरवणकर, सदस्या रचना महाडीक, बाळकृष्ण जाधव, संतोष थेराडे सहभागी झाले होते. एकात्मिक पाणलोट योजनेंतर्गत संगमेश्वर तालक्यातील बंधार्‍यांची कामे पूर्ण झाली आहे. परंतु ठेकेदारांना त्यांच्या अनामत रकमा परत केलेल्या नाहीत. हा मुद्दा थेराडे यांनी मांडला. सुमारे 25 ते 30 लाखाच्या रकमा असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. संबंधित सदस्यांशी चर्चा करुन त्याप्रमाणे कार्यवाही करावी अशा सुचना अध्यक्ष विक्रांत यांनी दिल्या आहेत. समग्र शिक्षणातील अभियंत्यांची पदे रिक्त असल्यामुळे ती भरेपर्यंत पूर्वी प्रमाणेच कामे करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

शाखा अभियंता खाचे यांच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींवरुन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सभेत सांगण्यात आले. खाचे यांच्याविरोधात सर्वसाधारण सभेमध्ये सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. लांजा पंचायती समितीच्या नवीन इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. विविध विकासकामांसाठी मंजूर झालेली कामांच्या निविदा प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी अशी सुचना केली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरणे, शिल्लक काम पूर्ण करणे, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी तील कामे पूर्ण करणे अशा सुचना यावेळी अध्यक्ष विक्रांत यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, जलजीवन मिशनमधील कामे, जिल्हा परिषद, उत्पन्न वाढ, वाहने व निवासस्थानांच्या दुरुस्त्या, नविन प्रशासकीय इमारती बांधणे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री  आणि ग्रामविकासमंत्री यांची भेट घेत अध्यक्ष विक्रांत यांनी 70 कोटीचा निधी आणला. याबद्दल सभागृहात आमदार भास्कर जाधव यांच्यासह अध्यक्ष विक्रांत यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.