दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

दापोली:- दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्याने सुरू असलेल्या बांधकामात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. रुग्णालयाच्या लिफ्टच्या टाकीत पडून ५ वर्षीय चिमुकला समीर श्रीकांत चव्हाण याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ठेकेदाराच्या आणि रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार, १२ जून) रोजी दुपारी ही घटना घडली. रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असताना, लिफ्टच्या रिकाम्या टाकीमध्ये पाणी साचले होते. खेळता खेळता चिमुकला समीर त्या टाकीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी या अपघातासाठी थेट ठेकेदाराच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरले आहे. बांधकाम सुरू असताना सुरक्षिततेच्या योग्य उपाययोजना केल्या नसल्यानेच हा अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता. नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसीलदार अर्चना घोलप यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दापोली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.