दापोली:- मालकाने नेहमीचे कपडे न घालता बैलाच्या जवळ आला म्हणून बैलाने मालकावर हल्ला केला. या हल्ल्यात बैल मालकाचा जागीच मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील पिसई वजरवाडी इथं ही घटना घडली आहे. विठोबा सखाराम घोले (वय 65) असं शेतकऱ्याचं नाव आहे. विठोबा घोले हे दापोलीत आले होते.
दापोलीतून ते पिसईला गेल्यावर त्यांचा बैल हा गावातील नदी नाल्यात असल्याचे कळालं. त्यामुळे घरी न जाता घोले हे बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी गेले होते. मात्र ते घरी परतलेच नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोधाशोध केला असता कुठेच पत्ता लागला नाही.
सकाळी त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळून आला. त्यांच्या डोक्याला, मानेला आणि छातीवर जखमा असल्याचे आढळून आले. त्यावरून बैलाने हल्ला केल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसाार, विठोबा वाघ हे नेहमी प्रमाणे बैलाला कोंडवाड्यात कोंडण्यासाठी जायाचे.
परंतु त्यांच्या अंगावर नेहमीची वस्त्र नसल्याने अनोळखी व्यक्ती समजून बैलाने त्यांना उचलून फेकले, ते जमिनीवर खाली पडल्यावर बैलाने दोन्ही पाय छातीवर ठेवले, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. विठोबा घोले यांच्या बैलाची गावात प्रचंड दहशत आहे. त्यांचा बैल दिसल्यावर गावाजवळचे लोक सुद्धा त्याच्याजवळ जात नाही.
एकदा घरातील व्यक्तीवर बैलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेकांनी बैलालाा विकण्याचा सल्ला दिला होता. पण, बैल चांगला आहे म्हणून घोले यांनी त्याला विकले नाही, त्याला घरीच ठेवले होते. बैल फक्त घोले यांनाच जवळ येऊ द्यायचा.
पण अचानक बैलाने मालकावरच हल्ला केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. घोले यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दापोली पोलिसांनी या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.