दापोलीतील ‘त्या’ शिकार प्रकरणी आणखी तिघांना अटक

आतापर्यंत अटक झालेल्यांची एकुण संख्या झाली 12

दापोली:– दापोली तालुक्यातील साकुर्डे येथे गोळी लागून शिका-याच्या झालेल्या मृत्यु प्रकरणी दापोली पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेष दिले आहे.

आता या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12 इतकी झाली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी दापोली तालुक्यातील भोंजाळी येथील अमित रहाटे, न्हानू कांता पेंडुरकर रा. पेंडूर ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग व आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी, रा. कुंभारवाडी, माणगाव ता. कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

साकुर्डे येथील विनोद मनोहर बैकर हे 31 मार्च 2021रोजी शिकारीला गेले असता दुपारी 11.30 वाजता पोटाजवळ बंदुकीची गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

विनोद बैकर याने शिकारीसाठी वापरलेली सिंगल बॅरल बंदूक ही विनापरवाना होती ती त्याने भौंजाळी येथील अमित रहाटे यांचेकडून घेतली असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. संशयित अमित रहाटे यांनी दोन वर्षांपूर्वी पेंडूर येथील न्हानू पेंडुरकर याचेकडून 16 बंदुका खरेदी केल्या होत्या त्यापैकी ही एक बंदूक होती. दापोली पोलिसांच्या पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन न्हानू पेंडुरकर व अप्पा उर्फ परेश धुरी यांना अटक केली. या संदर्भात न्हानू पेंडूरकर याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने या सर्व बंदुका अप्पा उर्फ परेश धुरी याचेकडून खरेदी केल्या असल्याचे पोलिसांना सांगितले.
या दोघांनी आणखी कोणाला अशा बंदुका विकल्या आहेत का याचा तपास सुरु असल्याची माहिती दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.