चिपळूण:- तालुक्यातील दहीवली बुद्रुक निम्मेवाडी येथे एका घरात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अजय महादेव कदम ( ५५, सध्या रा. दहीवली बुद्रुक निम्मेवाडी, ता. चिपळूण, मूळ रा. करजुवे, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणाऱ्या व्यक्तीची मृत व्यक्तीच्या घराशेजारी आंबा आणि काजूची बाग आहे. ०७ एप्रिल रोजी सायंकाळी १७:३० च्या सुमारास खबर देणारी व्यक्ती बागेत गेली असता, त्यांना मृत व्यक्तीच्या घरातून कुजलेला वास आला. त्यांनी तातडीने पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा उघडला. घरात अजय कदम हे मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.









