दहा टक्के मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम

जिल्हाधिकारी; ५० भरारी पथके, १३ हजार ७६३ नवमतदार

रत्नागिरी:- लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने आजपासून आचारसंहिता लागू झाली. त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाईल. ५० भरारी पथके नेमली असून ती निवडणूक विषयासंदर्भात कार्यरत रहातील. गेल्या लोकसभेला एकूण ६१.९९ टक्के मतदान झाले होते. हे आणखी १० टक्के वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मच्छीमार, स्थलांतरित मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूका जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भातील आदर्श आचारसंहितेची आणि निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. चुनाव पर्व, देश का गर्व, हे घोषवाक्य दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचे काम अतिशय पारदर्शक व्हावे, यासाठी प्रशासनाचा प्रयत्न राहील. यामध्ये बेकायदेशीर कॅश वाहतूक, मद्य वाहतूक, फेकन्यूज आदीवर विशेष लक्ष राहणार आहे. ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या २६ जार ४२६ आहे. त्यामध्ये ९ हजार ९६९ पुरुष, तर १६ हजार ४४६ महिलांचा समावेश आहे. १०० ते १०९ वर्षे असलेल्या ज्येष्ठ मतदारांची संख्या ५२९ आहे. त्यामध्ये १८६ पुरुष तर ३४३ महिला आहेत. त्यांच्यासाठी घरी मतदान करण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. या मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. या निवडणुकीत १३ हजार ७६३ नव मतदार महिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यामध्ये ७ हजार ४७५ पुरूष तर ६ हजार २८८ महिलांचा समावेश आहे.
लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. १९ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. २० तारखेला अर्जांची छाननी होणार असून ७ मे रोजी मतदान, तर ४ जूनला मतमोजणी होणार आहे.

पोलिस दलानेही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी ४ हजार १५१ कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये १३५ अधिकारी असून २ केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तर २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि २ हजार ११३ होमगार्डचा समावेश आहे. आचारसंहितेच्या काळात २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला जाणार आहे. पोलिस दलाचे सोशल मीडियावर विशेष लक्ष राहणार आहे. पोलिसांची स्वतंत्र भरारी पथके असणार आहेत. बेकायदेशीर कॅश वाहतूक, मद्य वाहतुकीवर बारीक लक्ष असणार आहे. गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्येगारांवर कारवाई केली जाणार असून काही तडीपार केले जाणार आहे. जिल्ह्यात दापोलीतील १ संवेदनशील केंद्र आहे. त्यावर आमचे विशेष लक्ष राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.