दहावी, बारावी परीक्षेत कॉपीमुक्त कोकण बोर्ड

रत्नागिरी:- राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत एकूण ३३४ कॉपीची प्रकरणे आढळली. त्यात दहावीच्या ९९ तर बारावीच्या २३५ गैरमार्ग प्रकरणांचा समावेश असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १२० तर कोकण विभागात शून्य कॉपीची प्रकरणे आढळली.

राज्यात दहावीची परीक्षा ५,०५० मुख्य परीक्षा केंद्रांवर, तसेच १६,३३५ उपकेंद्रांवर घेण्यात आली. मात्र, बर्‍याच कालावधीनंतर प्रत्यक्ष परीक्षा देणार्‍या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सुविधेचा गैरफायदा घेतल्याने, गैरमार्ग प्रकरणांची संख्या वाढली असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी संस्थेची मान्यता रद्द करण्याच्या इशार्‍यानंतर कॉपी प्रकरणात थेट घसरणही दिसून आली. बारावीची सर्वाधिक कॉपी प्रकरणे ही अमरावती जिल्ह्यात सापडली असून, त्यांची संख्या १२० आहे. कोकण विभागात बारावीच्या परीक्षेदरम्यान एकही कॉपी प्रकरण आढळले नाही. दहावीच्या परीक्षेत एकूण ९९ गैरमार्ग प्रकरणे पकडली असून, सर्वाधिक गैरमार्ग प्रकरणे नागपूरात ३१ व अमरावतीत २५ प्रकरणे आढळली. याबाबत अ‍ॅड. विलास पाटणे म्हणाले की, कोकण विभाग महाराष्ट्रात सातत्याने आठव्यांदा पहिला येत आहे. कोकणातील विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेच दर्शन तर होतेच त्याचबरोबर शून्य कॉपी प्रकरणामुळे त्याला प्रामाणिकपणाची किनार लाभली. कोकण बोर्डाच्या निर्मितीकरिता आंदोलनात चार पावलं टाकण्यासाठी प्रयत्न केले, ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागले आहेत.