दहावी, बारावीतील मुलींसाठी स्पर्धा परिक्षा केंद्र

डॉ. गजानन पाटील; नियोजनमधून 2 लाख 50 हजार रुपये

रत्नागिरी:- स्पर्धा परिक्षांसाठी कोकणातील विद्यार्थ्यांची मानसिकता तयार व्हावी यासाठी रत्नागिरीत बीएड कॉलेजमध्ये स्पर्धा परिक्षा केंद्र चालू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून दोन लाख पन्नास हजार रुपये निधी मंजूर आहे. पहिल्या टप्प्यातील दहावी, बारावीमधील मुलींना आठवड्यातून दर शनिवारी, रविवारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र (डाएट) प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी दिली.

स्पर्धा परिक्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मानसिक तयारी करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभाग पावले उचलत आहे. यामध्ये डाएटकडूनही योग्य ते मार्गदर्शन दिले जाणार आहे. शिष्यवृत्ती परिक्षा ही स्पर्धा परिक्षांचा पाया ठरू शकते. या परिक्षांना जास्तीत जास्त विद्यार्थी बसावेत असे प्रयत्न शिक्षण विभागाकडून चालू आहेत. त्यापुढे दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्यादृष्टीने तयारी करण्यासाठी मार्गदर्शन मिळावे म्हणून शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. स्पर्धा परिक्षांसाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ सर्वसामान्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यासाठी रत्नागिरीतील बीएड कॉलेजमध्ये स्पर्धा परिक्षा केंद्र सुरु केले जाईल. तेथे संदर्भ ग्रंथ ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात दहावी, बारावीच्या मुलींना सहभागी करुन घेण्यात येईल. त्यासाठी सहभागी होऊ इच्छिणार्‍यांसाठी एक लिंक पाठविली जाईल. ती भरुन घेतल्यानंतर संंबंधितांसाठी ऑनलाईन मार्गदर्शनाचे आयोजन केले जाईल. येत्या शैक्षणिक वर्षात याची सुरुवात केली जाईल. जिल्ह्यात कार्यरत असलेेले आयएएस, आयपीएस अधिकारी यांचे मार्गदर्शन वर्ग दर शनिवारी आणि रविवारी घेतले जाणार आहेत. या केंद्रामध्ये आवश्यक संदर्भ ग्रंथ लागणार असून खासगी कंपनींच्या सीएसआर फंडाचाही उपयोग करण्यात येणार आहे. याच ेसमन्वय अधिकरी म्हणून डॉ. संदिप पवार यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिले जाईल असे डॉ. पाटील यांनी सांगितले.