रत्नागिरी:-शालेय जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या खिलाडूवृत्तीला चालना मिळावी यासाठी विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रत्येक शैक्षणिक वर्षात केले जाते. चालू शैक्षणिक वर्षात कसल्याही क्रीडा स्पर्धा होणार नाहीत. 10 वी, 12 वीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असल्या तरी यामध्ये क्रीडा गुणांचा अद्याप विचार करण्यात आलेला नाही.
यावर्षीच्या क्रीडा गुणांवर कोरोनाचे सावट आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. अनेक खेळाडू इयत्ता 10 वी किंवा 12 वी मध्ये क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होतात. यामुळे त्यांना आपल्यातील खिलाडूवृत्ती जोपासण्याची संधी मिळते. शैक्षणिक वर्षात खेळांसाठी जास्तीत जास्त वेळ देवून राज्यस्तरापर्यंत मजल मारणार्या खेळाडू विद्यार्थ्याला परीक्षेतील गुणांमध्ये 25 गुण अतिरिक्त समाविष्ट केले जातात.
सन 202021 या शैक्षणिक वर्षामध्ये कोरोनामुळे शाळाच उशिरा सुरू झाल्या. याच वर्षी कोरोनामुळे क्रीडा स्पर्धाही झाल्या नाहीत. क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत तर यामध्ये या खेळाडूंचा दोष काय? म्हणून यावर्षी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याची अट शिथिल करून यापूर्वी खेळलेल्या व गुण मिळण्यास पात्र असलेल्या शालेय खेळाडूंना हे गुण मिळावेत. शैक्षणिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन न केल्याने खेळाडू विद्यार्थ्यांना यावर्षी सदरील गुणांपासून वंचित ठेवण्यात येऊ नये, अशी मागणी या विद्यार्थ्यांमधून केली जात आहे.
खेळांच्या गुणांसाठी विद्यार्थी शालेय जीवनामध्ये सातत्याने धडपड करत असतात. इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार क्रीडा गुण मिळतात. जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. परंतु, यावर्षी कोरोना संकटाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसह क्रीडा गुणांवरही पाणी फेरले आहे.दहावी तसेच बारावी बोर्डाने सर्व विद्यार्थ्यांना किमान क्रीडा गुण देण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.









