रत्नागिरी:- साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीला अर्थात दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा दसऱ्याच्या (ता. १२) मुहूर्तावर जिल्ह्यात १४८ जणांनी वाहने खरेदी केली तर आठवडाभरात ७८० वाहनांची खरेदी झाली. एकूण ९२८ वाहनांची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) कार्यालयात झाली. यामधून आरटीओला १ कोटी १५ लाख ७९ हजार ३८८ रुपये महसूल मिळाला आहे.
बदलत्या काळानुसार लोकांच्या राहणीमानातही बदल होत आहे. त्यामुळे वाहन खरेदीकडील कल दिवसेंदिवस वाढत आहे. बँकांसह खासगी फायनान्स कंपन्यांकडून १०० टक्के कर्ज प्रकरण होत असल्यामुळे आलिशान आणि विविध कंपन्यांच्या वाहनांची खरेदी होत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मिळालेल्या नोंदणीनुसार, जिल्ह्यात शनिवारी (ता १२) दसऱ्याच्या एका दिवसात १४८ वाहनांची खरेदी झाली. त्यामध्ये दुचाकी ८२, मोटार कार ३३, रिक्षा १५, गुड्स कॅरिअर वाहने १८ या वाहनांचा समावेश आहे, तर ६ ते १२ ऑक्टोबर या एका आठवड्यात ७८९ वाहनांची खरेदी झाली आहे. या वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंदणी झाल्यानंतर कराच्या रूपाने आरटीओ कार्यालयाला १ कोटी १५ लाख ७९ हजार ३८८ रुपये महसूल मिळाला आहे. वाहन खरेदीमधून प्रत्यक्ष आर्थिक उलाढाल सुमारे १० कोटींहून अधिक झाल्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत विविध कंपन्यांची शोरूम आहेत. या एजन्सींच्या माध्यमातून महिन्याला ३० ते ४५ च्या दरम्यान वाहनांची विक्री होत असल्याची माहिती कंपन्यांनी दिली.









