दरवर्षी येणार्‍या पुरापासून देवळे बाजारपेठेतील व्यावसायिकांची सुटका

रत्नागिरी:- काळाच्या ओघात पिढ्यानपिढ्या बारमाही वाहणारा देवळे (ता. संगमेश्‍वर) येथील मृतावस्थ झालेला ओढा दोन वर्षांच्या भगीरथ प्रयत्नांनी पुनर्जीवीत करण्यात यश आले आहे. दोन किलोमीटरच्या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असून ओढा पुर्वीप्रमाणे प्रवाहीत झाला आहे. सुमारे आठ कोंडीमध्ये (नैसर्गिक खड्डे) पाणी साचलेले आहे. तर दरवर्षी येणार्‍या पुरापासून देवळे बाजारपेठेतील व्यावसायिकांची सुटका झाली आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर देवळे गाव आहे. या गावातून वाहणारा ओढा गेल्या काही वर्षांमध्ये दगड गोट्यांनी भरून गेलेला होता. त्यामुळे ओढ्याने झरेही बंद झाले. बारमाही वाहणार्‍या ओढ्याचा प्रवाह थांबला आणि किनार्‍यावरील विहिरींची पाणी पातळीत घट झाली. शेजारील साखरपा येथील नदीतील गाळ काढण्याचे काम नाम फाऊंडेशनच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर निलेश कोळवणकर यांनी नामचे श्री. गोखले यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सहकार्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ‘जलसमृध्दी योजना देवळे’या नावाखाली प्रत्यक्ष कामाला आरंभ केाल. आर्थिक प्रश्‍न सोडविण्यासाठी ग्रामस्थांना आवहन करण्यात आले. त्यामधून सुमारे साडेसहा लाख रुपये जमा झाले आणि दीड लाख रुपये ग्रामपंचायतीने तरतूद केली. नाम फाऊंडेशनने मशिनरी उपलब्ध करुन दिली. त्यामुळे ओढा खोलीकरणाचे कामाला आरंभ झाला.
गेल्या वर्षी या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 40 टक्के काम पूर्ण झाले आणि 15 मे 2021 ला मोठा पाऊस झाला आणि काम थांबले; परंतु ग्रामस्थांचा कामाचा जोश कमी झाला नाही. या कामासाठी वापरण्यात येणार्‍या डीझेलचा दररोजचा खर्च पंधरा हजार रुपये येत होता. पूर्ण झालेल्या 600 मीटरच्या कामामुळे देवळे बाजारपेठेला गतवर्षी पुराच्या पाण्याचा फटका बसलेला नव्हता. उर्वरित कामाला यंदा उन्हाळ्यात आरंभ करण्यात आला. सुमारे 45 दिवसांमध्ये 1400 मीटरचा भाग खोलीकरण, रुंदीकरण करण्यात आले.
हे काम करताना तांत्रिक गोष्टींचाही विचार केला गेला.

पावसाचे पाणी साचून रहावे यासाठी नैसर्गिंक कोंडी (डोह) जशाश तशा जतन करु ठेवण्यात आल्या आहेत. त्यात सुमारे 6 ते 7 फूट पाणी उन्हाळ्यात आहे. पुढच्या वर्षी मुले तिथे पोहू शकतील. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्या पुढील भागात खोलीकरण झालेले नाही. वहाळाच्या काठावरील गाळ परत ओढ्यामध्ये जाणार नाही यासाठी ओढ्याकाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी राजेश कोळवणकर यांनी पुढाकार घेतला आहे. याला लागणारी 200 पर्यावरण पूरक झाडे दिपक शेट्ये यांनी दिली. ग्रामस्थांनी श्रमदानातून वृक्षारोपण करण्याचा निर्धारही केला आहे.