रत्नागिरी:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाेलिसांकडून ग्राम दत्तक याेजनेंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमधील आत्तापर्यंत ७४ हजार लोकांची तपासणी केली आहे.
सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळत आहेत. ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ग्राम दत्तक याेजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाेलीस दलाने जिल्ह्यातील ५२ गावे दत्तक घेतली असून, त्यामधली २८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी गावे दत्तक घेऊन त्या गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणे, गावामध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.
पोलीस खात्यांनी १८० स्वयंसेवक घेतले असून त्यांना जिल्हा परिषदेमार्फत कोरोना चाचणी करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वयंसेवकांनी ५५६ लोकांची कोरोना चाचणी घेतली.
यामध्ये पोलीस, बीट अंमलदार, ग्रामकृती दल, वाडी कृती दल, आशासेविका, स्थानिक ग्रामस्थ यांच्यातर्फे गावात जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. गावातील लोकांचे तापमान तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, तसेच कोरोना चाचण्या वाढवणे तसेच गावातील लोकांचे लसीकरण कसे लवकर होईल याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व करताना पोलीस जर कोणी बाधित झाला तर त्याला विलगीकरण कक्ष किंवा पोलिसांसाठी तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. सर्व पोलीस आपली काळजी घेऊनच हे कर्तव्य बजावत आहेत.









