दडी मारलेला पाऊस पुन्हा बरसणार; चार दिवस अतिवृष्टीची शक्यता

रत्नागिरी:-गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय होण्याची शक्यता आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून कोकणात पुढील 4 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

बंगालच्या उपसागरात पुढच्या दोन दिवसांत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली. वाढत्या उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. अशात ही बातमी या सगळ्यांनाच दिलासा देणारी ठरली आहे. सगळेच जण पावसाची चातकासारखी वाट बघत आहेत.