दक्षिण रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत

रत्नागिरी:- रत्नागिरीच्या राजकारणातील एक उमदे व्यक्तीमत्व व सर्वसामान्यांमध्ये मिसळून काम करणारे राजेश सावंत यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाने दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी देऊन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेल्या सावंत यांच्यावर भाजपाने विश्वास दाखवला आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एकेकाळी निकटवर्तीय असलेल्या राजेश सावंत यांनी राष्ट्रवादीमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून पक्षाची चांगली बांधणी केली होती. ग्रामीण भागात त्याकाळी शिवसेनेला टक्कर देत सावंत यांनी पक्ष विस्तारात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. याठिकाणी नगरसेवक, उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. परंतु विकासात्मक मुद्यावरुन होणारी गळचेपी लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला रामराम करीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता.

भाजपमध्येही त्यांनी चांगले काम करण्यास सुरुवात केली होती. ग्रामीण भागातील जुन्या कार्यकर्त्यांशी असणारा ‘टच’ वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्याही लक्षात आला होता. सर्वसामान्यांची कामे होत नसतील तर स्वत: अधिकार्‍यांसमोर बसून ती करुन घेण्याच्या हातोटीमुळे कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या कामाची पध्दत बघून त्यांच्यावर विश्वास टाकला. भाजपाच्या प्रदेश पातळीवरुन त्यामुळे त्यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या जुन्या व नव्या पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन रत्नागिरी तालुक्यासह लांजा, राजापूर व संगमेश्वर तालुक्यात मोठ बांधावी लागणार आहे.