रत्नागिरी:- बदलत्या वातावरणामुळे हापूसवरील फूलकीडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव रोखण्यासाठी बागायतदारांना कसरत करावी लागत असातना आता वाढत्या तापमानाचा धोकाही हापूसच्या गुणवत्तेत अडथळा निर्माण करणारा ठरत आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यातील उत्पादन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा प्रत्यय रत्नागिरी जिल्ह्यात दिसत आहे. सध्या वातावरणात उष्मा वाढला आहे. सकाळी 11 वाजल्यानंतर नागरिकांनाा उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. ऐन हंगामात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने कोकणातील हापूस संकटात सापडण्याची
भीती आहे. तसेच काजूसह कोकमाला फटका बसणार आहे.
आंबा फळामध्ये साका होऊन ते वाया जाऊ शकते. यंदा फेब्रुवारी महिन्यात आलेल्या मोहोराला काहीप्रमाणात फळं लागली आहेत. वाटाण्यापेक्षाही थोडा मोठा आकार असलेली कैरी पिवळी पडून पडून नुकसान होत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे फळ भाजते, तर बारीक कैरी पिवळी पडून गळून जाते. फेब्रुवारीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे कैरी वाचविण्यासाठी केलेली औषध फवारणी वाया गेली. बारीक कैरीला तापमान सहन होत नसल्याने नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया येथील बागायतदारांनी दिली.