थिबा राजवाड्यात सुरू होणार नवी आठ दालने

3 कोटी 22 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे

रत्नागिरी:-रत्नागिरीतील प्रसिध्द ब्रिटीशकालीन थिबा राजवाड्याची माहिती घेण्याबरोबर पर्यटकांना याठिकाणी आणखीन मोहित करण्यासाठी अन्य कला-वस्तूंची दालनांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी येथील पुरातत्व विभागाकडून 3 कोटी 22 लाखांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. हा निधी मंजूर होताच येथील कला दालनांच्या कामाला प्रारंभ होणार आहे. 
 

थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीची कामे अंतिम टप्प्यात गेल्यानंतर राजवाड्याचे अंतरंग पुरातत्व विभागाने पर्यटकांसाठी खुले केले. पण अंतर्गत काही कामांची दुरूस्तीची कामे व परिसराचा विकास अजूनही प्रलंबित राहिलेला आहे. थिबा राजवाड्याच्या दुरूस्तीवर कोट्यावधीचा निधी खर्च केला जात आहे. पर्यटन निधीतूनही या स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण मागील काळात त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीसाठी कोट्यावधींचा निधी खर्च होत आहे.   राज्य संरक्षित स्मारक जतन-दुरूस्ती योजनेतून राजवाड्याच्या छताच्या कामासाठी 1 कोटीचा निधी मंजुर होऊन छताचीही दुरूस्ती यापूर्वीच करण्यात आली. राजवाड्यातील लाकडी सामान त्यामध्ये खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्या आदी कामांसाठी 1 कोटी 35 लाखाचा निधी मागील काळात मंजूर झालेला होता. त्यातून मोडकळीस आलेले लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे करण्यात आली. राजवाड्याचे छप्पर, गॅलरी, खिडक्या, जिने व अन्य कामे करण्यात आली. राजवाडा बांधण्यात आला, त्यावेळी ज्या पद्धतीने काम झाले, त्या पद्धतीने पुरातत्व विभागाच्या सुचनांनुसार सागवानी लाकडामध्ये संपूर्ण लाकडी काम करण्याची कार्यवाही झाली. अजूनही राजवाड्यातील काही खोल्यांच्या दुरूस्तीची कामे शिल्लक आहेत.  

गतवर्षी राजवाडा पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला. राजवाड्यात एकूण 14 खोल्या आणि दोन मोठी दालन आहेत. मात्र येथील दालनांचा विकास करण्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. जेणेकरून राजवाड्याची माहिती घेण्याबरोबरच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना तेथे रममाण होता यावे. यासाठी राजवाड्यात 8 विविध संग्रहीत कला व वस्तूंची दालने उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये ऐतहासिक वस्तू, शस्त्र दालन, मूर्ती दालन, नौका दालन, पुरातन वस्तू दालन, चित्र दालन अशा विविध दालनांचा समावेश आहे.  सुमारे सहा वर्षापुर्वी कोल्हापुरमधून 21 जहाज व होड्या पाप्त आहेत. यामध्ये मचवा, पगार, होडी, पडाव, बतला, कोथया, अरब डो, अरब बार्ज, गलबत, डांगी, पोर्तुगिज बोट, बग्गाला, पोर्तुगिज, बाँब केज, गुराबा, ब्रिटीश गॅली, इंग्लिश स्मॉल गॅलन, ब्रिटीश गली, पाल, पोर्तुगिज गॅलॅलो आदी प्रकारांच्या जहाजांचा समावेश आहे. या  दालनांच्या निर्मितीचा 3 कोटी 22 लाखांचा पस्ताव येथील पुरातत्व विभागामार्पत शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या पस्तावाला मंजूरी मिळताच येथील दालन निर्मिती कामाला प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.