थिबा राजवाड्यात नऊ दालनांसाठी सव्वा तीन कोटींचा निधी 

रत्नागिरी:- प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या थिबा राजवाड्याच्या सुशोभिकरणासाठी मंजुर झालेल्या ३ कोटी २५ लाख रुपयांच्या कामांना शासनाकडुन नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामधुन थिबा राजवाड्यात विविध प्रकारची नऊ दालने पर्यटकांसाठी विकसित केली जाणार आहे. येत्या दोन दिवसात निविदा प्रक्रिया केली जाणार असुन दोन वर्षात या दालनांची कामे पुर्ण होतील, असे पुरातत्व विभागाचे अधिकारी विलास वहाणे यांनी सांगितले.

थिबा राजाचे वास्तव्य असलेल्या रत्नागिरी शहरातील थिबा राजवाडा पर्यटकांसाठी सुसज्ज करण्यावर शासनाकडुन प्रयत्न सुरु आहेत. हा राजवाडा पुरातत्व विभागाकडे आहे. याचे मजबुतीकरण काही महिन्यांपुर्वीच झाले होते. राजवाडा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आतमध्ये नाविन्यपुर्ण काहीतरी पहावयास मिळावे या उद्देशाने पुरातत्व विभागाकडून नऊ दालने विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे सव्वा तिन कोटी रुपयांच्या प्रस्ताव पडुन होता. मागील वर्षी शासनाने याला निधी मंजुर केला होता. तांत्रिक प्रक्रिया सुरु झाली. आठ दिवसांपुर्वी नऊ दालनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. थिबा राजवाड्यातील संग्राहलयात सध्या चार दालने आहेत. त्यामध्ये ऐतिहासिक साक्ष देणार्‍या वस्तु पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. या दालनांच्या सुशोभिकरणासह आणखी पाच नवीन दालने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये इतिहासाची साक्ष देणारे फोटो लावले जाणार आहेत. यामध्ये दरबार हॉल, कातळ शिल्प दालन, आरमार दालनांचा समावेश आहे. आरमार दालनात तिस युध्द नौकांच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महारांजांनी आरमार कसे उभे केले, कान्होजी आंग्रेच्या आरमाराची माहिती असेल. तसेच पर्यटकांना संपुर्ण परिसर फिरता येईल असे नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील सर्व कातळशिल्पांचे फोटो, त्याचे महत्व सांगणारे फोटो माहितीपत्रके दालनात ठेवली जाणार आहेत.