रत्नागिरी:- शहरातील थिबापॅलेस नजिकच्या साईश्वरी अपार्टमेंटमध्ये २१ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मारुती मंदिर येथील खाऊ गल्लीत प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या या तरुणाने रात्री घरी येऊन आत्महत्या का केली? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. असून पंचनामा करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.
अनिकेत चंद्रकांत चाफेकर (२१) हा तरुण आपल्या आईसह साईश्वरी अपार्टमेंट येथे राहत होता. मूळचे खंडाळा येथील असलेले कुटुंबीय व्यवसायासाठी रत्नागिरी आले होते. शहरातील मारुती मंदिर येथे असलेल्या खाऊ गल्लीत चायनीजची गाडी चालवून माय-लेकरे आपला संसाराचा गाडा चालवत होते. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे अनिकेत आपल्या आई सोबत खाऊगल्ली येथे गेला होता. गाडीवर साहित्य लावून झाल्यानंतर काहीतरी काम असे सांगून तो घरी आला. सायंकाळी व्यवसायासाठी बाहेर पडल्यानंतर घरी परत न येणारा अनिकेत अचानक घरी का आला ? हे पाहण्यासाठी शेजारी राहणाऱ्या महिला गेल्या असता त्यांना दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. अनिकेतने आतून प्रतिसाद न दिल्याने त्यांनी त्याच्या आईला याची माहिती दिली.आई घरी आल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अनिकेतने बेडरूममधील पंख्याला साडीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. अनिकेतच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्यवसायात खूप मेहनत घेऊन काम करणाऱ्या अनिकेतच्या आत्महत्येचे वृत्त पसरतात खाऊगल्लीतील व्यवसायिकांनी त्याच्या घरी धाव घेतली होती. मात्र अनिकेतच्या आत्महत्येमागील गुढ वाढले आहे.