‘थर्टीफर्स्ट’ पार्ट्यांवर राहणार पोलिसांचा वॉच

रत्नागिरी:- नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्ताने पर्यटक जिल्ह्यात येऊ लागले आहेत. विशेषत: दापोली, गुहागर व गणपतीपुळेमध्ये पर्यटकांची संख्या मोठी असून याठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्तही वाढवण्यात आला असून, वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांची जादा कुमक ठेवून वाहनचालकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली.

मागील पाच दिवसापासून जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. थर्टीफर्स्टपर्यंत ही संख्या वाढेल. जिल्ह्यात दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. गणपतीपुळे येथून रत्नागिरी व पावसकडे येणार्‍या पर्यटकांची संख्याही वाढली आहे. किनार्‍याकडील भागाकडे विशेष लक्ष देण्याच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने नियोजन केले आहे.
या कालावधीत पर्यटनस्थळांकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी नेमले जाणार आहेत. समुद्रकिनार्‍यावरती धोकादायक ठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती केली जाणार असून ग्रामीण भागात पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची मदत घेतली जाणार आहे. येणार्‍या पर्यटक महिलांच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले जाणार आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात मद्यालये रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी असल्याने रात्रीच्यावेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मद्यप्राशन करुन वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही स्पष्ट आदेश अधिकारी व कर्मचार्‍यांना देण्यात आले आहेत. पर्यटनस्थळे व रस्त्यावर हुल्लडबाजी करणार्‍यांवरही कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. धार्मिक पर्यटन स्थळे व गडकिल्ल्यांवरही पोलीस विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.