थकीत वीजबिल वसुलीसाठी वीज पुरवठा तोडणार

महावितरणचा निर्णय; दीड लाखाहून अधिक थकबाकीदार ग्राहक

रत्नागिरी:- थकीत वीजबिल वसुलीसाठी मोहिम राबविण्यात येणार आहे. ज्या विजग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सध्या १ लाख ६४ हजार ९१३ ग्राहकांकडे ८५ कोटी ३२ लाख ८४ हजार एवढी थकबाकी आहे. थकबाकी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही.
जिल्ह्यातील ९७ कृषी पंप ग्राहकांकडे १ लाख ३ हजार रु. ची थकबाकी आहे. तर २ हजार १८५ औद्योगिक ग्राहकांकडे ९ कोटी २५ लाख ७४ हजार रु. ची थकबाकी आहे. राज्यात मार्च २०२० मध्ये कोविड १९ मूळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता. थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहिमा राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले आहे. तेंव्हा थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.