थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा होणार खंडित 

रत्नागिरी:- मार्च 2020 पासून थकीत असणार्‍या वीज ग्राहकांचे सप्टेंबर अखेर चालू  वीज देयक भरणा करण्यासाठी ताबडतोब वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) आणि कोकण प्रादेशिक संचालक प्रसाद रेषमे यांनी दिले आहेत.

त्यांनी नुकतीच कोकण परिमंडळ व त्या अंतर्गत रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी कोंकण परिमंडळ कार्यालय येथील मुख्य अभियंता विजय भटकर, अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक अभियंता विनोद पाटील उपस्थित होते.

महावितरण कंपनीच्या महसूल वाढीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी 0 ते 30 युनिट वीज वापर असणार्‍या ग्राहकांचे वीजमीटर तपासणे, तसेच कागदोपत्री वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी गरजेचे असल्याचे प्रतिपादन महावितरण कंपनीचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) आणि कोकण प्रादेशिक संचालक प्रसाद रेषमे यांनी केले. अशा प्रकारे तात्पुरत्या स्वरूपात खंडित केलेल्या ग्राहकांचे वीज वापर आणि जोडणी तपासण्यासाठी विशेष लक्ष घालण्यात यावे यासाठी त्यांनी निर्देश दिले. या शिवाय विजेची सर्वाधिक हानी असलेल्या फिडरचे एनर्जी ऑडिट करावे. वीज चोरीचा संशय असल्यास तत्काळ संशयास्पद स्थळाची तपासणी करून वीज चोरावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आपल्या कामात कुचराई करणार्‍या कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करणे भाग पडणार आहे याची जाणीव त्यांनी करून दिली आहे.
कोंकण परिमंडळ मुख्य अभियंता विजय भटकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हावार माहिती संगणकीकृत पद्धतीने सादर केली तसेच या महिन्यातच कोकण परिमंडळ अंतर्गत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थकबाकी वसुली आणि वीज चोरीची कारवाई गतिमान करण्यात येईल, असे सांगितले. तसेच सध्या  कोंकण परिमंडळावर असलेला 93 कोटी 40 लाख रुपयांच्या थकबाकीचा बोजा नक्कीच कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.