थकबाकीदार असल्याची माहिती लपवली; परशुराम निवेंडकर यांचे चेअरमनपद धोक्यात?

रत्नागिरी:- कर्ज थकित असतानाही रत्नागिरी जिल्हा परिषद सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.

परशुराम तुकाराम निवेंडकर यांची चेअरमनपदी निवड झाली आहे. श्री. निवेंडकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माळनाका शाखेचे खातेदार असून त्यांनी त्या शाखेमधून घेतलेले कर्ज थकित आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार उमेदवार जर संबंधित संस्थेचा अथवा मातृसंस्थेचा थकित कर्जदार असेल तर अशी व्यक्ती सदर पदाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरते. ही माहिती संबंधित उमेदवाराने चेअरमन पदाची निवडणूक लढविण्यासाठी निवडणूकिचा अर्ज सादर करताना देणे आवश्यक होते; परंतू त्यांनी सदरची माहिती लपवून ठेवून सदर निवडणूक लढविली आहे. श्री. निवेडकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावरुन तातडीने दूर करुन त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशिर कारवाई करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी ती कारवाई न झाल्यास याबाबत लोकशाही दिनात तक्रार करु असे पत्रही नुकतेच देण्यात आले आहे.